कवी शशिकांत हिंगोणेकर हे समकालीन आंबेडकरी काव्यप्रांतातील महत्त्वपूर्ण नाव आहे. गेल्या तीन दशकांपासून त्यांनी सामाजिक परिवर्तन, संघर्षशील जीवनदृष्टी आणि सौंदर्यभान यांचे संयमितपणे काव्यरूप साकारले आहे.
‘या नव्या वर्तमानात’ या कवितासंग्रहात त्यांच्या आंबेडकरवादी जीवनदृष्टीची आणि वैयक्तिक तसेच सामाजिक भावव्याकुळतेची मोहक अभिव्यक्ती दिसून येते. त्यांच्या कविता वैयक्तिकतेच्या तरलतेतून सामाजिक भान आणि सृष्टिसंवादी भावनांचा संगम साधतात.
‘श्वासात ओल नाही / तरीही काळजात / झरे पाझरतात’ या काव्यपंक्तीतून ऋतुचक्राचे संवेदनशील चित्रण होते, तर ‘मावत नाहीय दुःख / माझ्या कवितेच्या ओळीत’ अशा ओळींतून त्यांच्या अंतर्मनातील अस्वस्थता प्रकटते. त्यांच्या कविता रणरणत्या वास्तवावर प्रकाश टाकत ‘कविता नेहमीच झालीय / उन्हात पोळलेल्यांसाठी सावली’ अशी संवेदना मांडतात.
‘या नव्या वर्तमानात’ मधील कविता समकालीन परिस्थितीचे आव्हान स्वीकारून सामाजिक परिवर्तनासाठी लढा देणाऱ्या प्रेरणादायी कलाकृती आहेत.
- डॉ. शैलेंद्र धर्मदास लेंडे
मराठी विभागप्रमुख
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर