प्रत्येक शिक्षक हा जातिवंत शिक्षक असतोच. पण तो विद्यार्थ्याचा पालक ही असतो. दोन्ही भूमिका तो एकाच वेळी बजावत असतो. किंबहुना तो पालक अधिक असतो. म्हणून विद्यार्थ्यांबद्दल वात्सल्याचा पान्हा त्यांना अगोदर फुटतो. नेमलेल्या पाठ्यपुस्तकांमधील नियोजित विषयांचे ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांच्या गळी उतरवण्यात तो हमखास सफल होतो. त्याचं कारण, त्याचं अध्यापन कौशल्य एवढंच नाही, तर त्याबरोबर त्याचं शिष्यवात्सल्य हेही आहे. आपल्यावर सोपवलेलं काम निष्ठेने व नियमितपणे करणं. आपलं अध्यापन कौशल्य पणाला लावून अपेक्षित ज्ञान विद्यार्थ्यांकडे संक्रमित करणं, ते त्याला अवगत करता आलं की नाही, याची चाचपणी म्हणून अधूनमधून चाचणी परीक्षा घेणं, विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अधिकाधिक सुधारणा घडवून आणणं, विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत करणं, त्याचबरोबर त्याच्यामधील चिकित्सा वृत्तीलाही प्रोत्साहन देणं, वारंवार प्रतिप्रश्न विचारून शंकासमाधान करून घेण्यास त्याला प्रवृत्त करणं, विषय-ज्ञानाबाबत त्याला आपल्या पातळी पर्यंत आणून पोचवणं, आपल्याशी चर्चा करण्याएवढा त्याचा आत्मविश्वास वाढवणं ही झाली शिक्षकाची एक बाजू. पण या निमित्तानं जवळ आलेल्या विद्यार्थ्याच्या व्यक्तित्वाचे विविध कंगोरे साक्षेपानं साफसूफ करून घेणं, त्याच्यातल्या सुप्त गुणांना विकासासाठी वाव देणं, एकूण त्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्याला मदत करणं, जग व जीवन याबद्दलची डोळस जाण त्याच्यामधे उत्पन्न करून हळूहळू वाढवत नेणं, तो एक परिपूर्ण नागरिक बनेल या दृष्टीनं त्याच्या वाढीकडं लक्ष पुरवणं ही शिक्षकाची दुसरी बाजू. यासाठी प्रशिक्षण प्रमाणपत्राची आवश्यकता नसते. फक्त पालकाचं अंतःकरण असावं लागतं. समोरचा मुलगा हा आपला विद्याथ आहे असं मानलं, तर गुरूशिष्यांच्या नात्यात रूक्षपणा येतो. अंतर उत्पन्न होतं अन् तो एकदा परीक्षेत उत्तीर्ण किंवा अनुतीर्ण झाला, की त्याच्याशी असलेलं शिक्षकाचं नातं संपुष्टात येतं. विद्यार्थ्याऐवजी तो आपला पाल्य ही दृष्टी एकदा स्वीकारली, की संबंधात ओलावा निर्माण होतो व अभ्यासाव्यतिरिक्तच्या वेळाकडं व अवस्थेकडं लक्ष पुरवावंसं वाटतं. शिष्यांचं जाऊन तिथं पितापुत्राचं नातं आकार घेऊ लागतं. या नात्यामध्ये ते एकमेकांमधल्या उणिवा दूर करतात व एकमेकांच्या निकोप वाढीस साहाय्यभूत होतात.
तेव्हा शिक्षकांच्या या दोन्ही बाजूंचा आपण अभ्यासू नजरेनं विचार करायला हवा !