लेखक, समीक्षक म्हणून नाही, तर एक सुजाण वाचक, आस्वादक म्हणून अभिप्राय नोंदवा, असे सांगून पुस्तकाची स्क्रिप्ट माझ्या हातात दिली गेली. साहित्यसंशोधन पूर्ण केले, म्हणून समीक्षक होता येते असे नाही, तर त्या लेखनातील मार्मिकता, गांभीर्य व समाजाकडे बघण्याचा लेखकाचा दृष्टिकोन हा वाचकास लक्षात यायला पाहिजे. आणि म्हणूनच मला डॉ. मनोहर सुरवाडे यांच्या ‘षटकार’ ह्या पुस्तकाकडे पाहणे सोपे गेले. एक रसिक, वाचक व साहित्यसंशोधन अभ्यासक म्हणून प्रस्तुत पुस्तकाकडे पाहत असतांना माणसाच्या जगण्याच्या विविध पद्धती काव्यात्मरीतीने त्यांनी सांगितलेल्या आहेत, असे दिसून आले. या पुस्तकात अधोरेखित झालेल्या मानवी स्वभावाच्या अनेक तऱ्हा वाचायला रंजक वाटतात. त्या वैविध्यपूर्ण असून मनाला अंतर्मुखही करून जातात. कारण माणसाच्या वागण्याच्या मुळाशी त्याच्यावर झालेले परंपरागत मूल्यसंस्कार रुजत असतात व त्यातून त्याच्या काही धारणाही बनलेल्या दिसून येतात. त्याचा स्वभावही त्यातूनच बनलेला असतो. काहीशा प्रमाणात त्याला तो स्वभाव आजच्या व्यावहारिक जीवनात अडचणीचाही ठरतो व इथेच सारा घोळ होतो. जगणे निरस वाटत जाते. मग व्यक्ती सुखापेक्षा दुःख जास्त अनुभवते, तरीही बदलत नसते. त्याने त्याच्यातील बदल त्याच्या सोयीनुसार व परिस्थितीनुसार केल्यामुळे मानवी हितासाठी तो बदल उपकारक ठरेलच असे नाही, याची जाणीव लेखकाने आपल्या लेखनात अनेकदा करून दिलेली आहे. तेव्हा खरंच माणसाच्या जगण्याच्या किती विचित्र तऱ्हा असतात. हे ‘षटकार’ मध्ये जागोजागी दिसून येते.त्यातील काव्यात्मता, रंजकता व बोधरुपातील सूचक विधाने पाहता प्रत्येकाने वाचावे, असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. ते वाचून ज्याने त्याने आपल्या जीवनात मॅच खेळताना सिक्सर मारून खेळ जिंकून यशस्वी व्हावे, एवढेच म्हणता येईल, परंतु त्यासाठी आपल्याला आपल्याच काही सवयींमध्ये बदल करावे लागतील, अशी या पुस्तकाची अट राहील, ती अट मान्य केली तरच मानवी जीवनात आंतरिक सुखप्राप्ती होऊ शकते, असे मला वाटते. दुसरे असे की, मराठी साहित्याच्या क्षेत्रात चार ओळीची चारोळी, हा काव्यप्रकार सर्वाना माहीत आहे. आता डॉ. सुरवाडे यांनी साहित्याला सहा ओळीचे काव्य म्हणजे ‘षटकार’, हा काव्यप्रकार दिला, असे म्हणायला काही हरकत नाही.
- प्रा. उन्नती चौधरी