मराठी साहित्यातील काही महत्त्वाच्या कलाकृतींच्या आशय आणि अभिव्यक्तीच्या अंगाने घेतलेले हे चिंतन केवळ समीक्षण नसून, एक संवेदनशील आणि सामाजिक भान असलेल्या मनाचा वस्तुनिष्ठ शोध आहे. कविता, कथा, कादंबरी, नाटक अशा विविध वाङ्मयप्रकारांच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या ज्वलंत सामाजिक वास्तवाचा, मानवी मनोवस्थांचा आणि सांस्कृतिक घडामोडींचा सखोल वेध या ग्रंथात घेतलेला आहे.
राष्ट्रीय भावना, व्यसनाधीनता, मनोविकृती, जातिभेद, आर्थिक विषमता, शेतकऱ्यांच्या व्यथा, ग्रामीण संघर्ष आणि शहरी झगमगाट यांचे ताणतणाव... या सर्वांवर या ग्रंथातील समीक्षणांनी अतिशय संवेदनशील आणि चिकित्सक दृष्टिकोनातून प्रकाश टाकलेला आहे. त्याचबरोबर महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार, स्त्रीजीवन, कुटुंबसंस्था आणि गावगाड्याची सर्वांगाने होत असलेली पडझड यावर आधारित कलाकृतींचे अभ्यासपूर्वक विश्लेषणही येथे आढळते.
या ग्रंथातील लेखन हे केवळ साहित्याच्या मर्यादेत न अडकता, समाजाच्या व्यापक संदर्भांशी संवाद साधते. प्रत्येक कलाकृतीच्या मागे असलेल्या सामाजिक, ऐतिहासिक आणि मनोवैज्ञानिक पार्श्वभूमीचा विचार करताना, लेखक स्वतःची भूमिका कुठेही लादत नाही, तर वाचकाला स्वतंत्रपणे विचार करण्यास उद्युक्त करतो. त्यामुळे हे समीक्षण नुसते आस्वादपर न राहता, चिंतनपर अनुभव देते.
प्रा.डॉ. जतिन मेढे हे खानदेशातील एक विचारवंत, अभ्यासू आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. त्यांच्या सामाजिक-सांस्कृतिक कार्याचा आणि चिंतनशील दृष्टिकोनाचा परिपाक या ग्रंथातून प्रकर्षाने जाणवतो. एक समीक्षक म्हणून त्यांची ही भूमिका वाचकांसाठी नवा दृष्टीकोन घेऊन येणारी ठरेल.
‘साहित्य चिंतन’ हे केवळ साहित्यावरचे चिंतन नाही, तर समाजाच्या मनोभूमिकेचे, संघर्षांचे आणि बदलत्या काळाच्या स्पंदनाचे भाष्य आहे. संवेदनशील वाचकांनी नक्कीच जवळ ठेवावा असा हा ग्रंथ आहे.
- प्रा. डॉ. वासुदेव वले
सदस्य - मराठी अभ्यास मंडळ,
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.