नमस्कार श्रोते हो ! आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. तीनशे अठ्ठ्याहत्तर अंश सात आठ मीटर अर्थात सातशे नव्व्यान्नव किलो हर्ट्स आकाशवाणीच्या केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळची पाच वाजून पन्नास मिनिटं व दहा सेकंद झाले आहेत... इथून सुरू झालेला पारंपरिक रेडिओचा आवाज आता नमस्कार मित्रांनो! कसे आहात... ट्रॅफिकमध्ये अडकले असाल तर चिंता करू नका, कारण तुमच्या सोबतीला आहे तुमचा दोस्त ठग... इथपर्यंत आलेला आहे. या काळातील आवश्यक वेगाबरोबरच जनतेच्या दैनंदिन आयुष्यातील घटनांचा आपल्या निवेदनात उल्लेख करत त्यांच्या भावविश्वाच्या जवळ जाणारे निवेदन अधिक जवळचे वाटते.
1923 साली भारतात पहिले रेडिओ प्रसारण झाले आणि 2001 मध्ये खाजगी एफ.एम. स्टेशनची सुरुवात झाली. भारतातीलच नव्हे तर जगातील लहान लहान गावात वेगाने माहिती पोहोचवण्याचे पहिले काम कोणी केले असेल तर ते रेडिओ - आकाशवाणीने... म्हणजेच त्यातून माहिती संकलित करून ती लोकांपर्यंत पोहोचविणाऱ्या निवेदकाने... आजच्या भाषेत ठग ने. चांगला आवाज आणि भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या व्यक्तींना नोकरीची एक संधी म्हणून सुरू झालेल्या या क्षेत्रातील व्यक्ती आता सेलिब्रिटी म्हणून समाजाच्या सर्व क्षेत्रात वावरतांना दिसत आहेत. हे क्षेत्र आता करिअरची एक संधी म्हणून वेगाने पुढे येत आहे.
‘रेडिओ जॉकी’ या पुस्तकाच्या निमित्ताने या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना या क्षेत्राच्या माहिती बरोबरच या क्षेत्रात काम करतांना आवश्यक असणारी अंगभूत कौशल्ये आणि प्रभावी वक्तृत्व शैली, निरीक्षण क्षमता, संवाद कौशल्याबरोबरच व्यासंग, अद्ययावतता, लेखनशैली अशा अनेक बाबींच्या पैलूंविषयीची माहिती, रेडिओ केंद्रातील विविध विभाग, उपकरणे, ध्वनिमुद्रण यासारख्या तांत्रिक बाबीची देखील माहिती मिळते. 21व्या शतकातील या नव्याने प्रस्थापित होत असलेल्या क्षेत्राविषयीची माहिती जाणून घेणाऱ्यांना हे पुस्तक मोलाची मदत करेल.
मराठी भाषेतील ‘रेडिओ जॉकी’ या विषयावरील पहिलं पुस्तक असलेल्या पुस्तकाचे लेखक डॉ. योगेश महाले व डॉ. संदीप माळी यांचं या प्रयत्नाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
- प्रा. (डॉ.) विद्या पाटील
विभागप्रमुख तथा अध्यक्ष, मराठी अभ्यास मंडळ,
मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त), जळगाव