भोवतालातील आवाजी वास्तवामुळे समकाळाचा स्वर अधिकाधिक क्षीण होत चालला आहे. स्व-आंतरिकतेची लय समजून घेण्यासाठी अवसर मिळणे जगण्याच्या गोंगाटात दुरापास्त होत चालले आहे. त्यातूनच कवितेच्या निर्मितीपुढे, अस्तित्वापुढे प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण कवितेच्या असण्याचे, तिच्या कवितापणाचे स्व-आंतरिकतेच्या अभिव्यक्तीशी जीवाभावाचे नाते आहे. भौतिकतेच्या रेट्यामुळे हरवत गेलेला जगण्यातील ओलावा, स्नेह आणि सुरक्षित, सोयीच्या कप्पेबंद जगण्याची लागलेली चटक, त्यातून प्रत्ययास येणारे संवेदनाशून्य व विचारनिष्प्रभ असे भोवतालाचे निगरगट्ट विश्व यांमुळे कवितेच्या निर्मितीपर्यंत, तिच्या कवितापणापर्यंत पोहोचावे तरी कसे? असा प्रश्न निर्माण होतो. समकाळात कवितानिर्मितीपुढे हा पेच उभा ठाकलेला असला तरीही तथाकथित कविता लिहिणे मात्र थांबलेले नाही. परंतु कवयित्री उषा हिंगोणेकर या पेचाविषयी सजग आहेत. म्हणूनच की काय मौनाचा मार्ग त्यांना आपलासा करावासा वाटतो. स्व-आंतरिकतेचा तळ धुंडाळण्यासाठी मौन हा सर्वोत्तम मार्ग आहे, याची त्यांना खात्री पटलेली आहे. समकाळाच्या धबडग्यात स्वत्वपूर्ण स्वर उच्चारण्यासाठी हा मार्ग अनुसरण्याशिवाय पर्याय नाही. काव्यनिर्मितीविषयीचे हे सजग भान या संग्रहातील कवितेला लक्षणीयता बहाल करते. मौनाच्या गाभाऱ्यातून (स्व-आंतरिकतेला साद घालून) कवितेच्या शब्दांना आकार देण्यासाठी हे कविमन अस्वस्थतेच्या गर्तेत स्वतःला झोकून देते. आत्मसन्मान, अस्तित्व यांसाठी कराव्या लागणाऱ्या उठावासाठी सज्ज होत असलेले हे कविमन मनाच्या तळघरातील अंतःस्फोटाचे सामर्थ्य जाणून आहे याचा प्रत्यय या संग्रहातील कवितांतून प्राधान्याने येतो. म्हणूनच कोणत्याही प्रकारची भावव्याकुळता वा वैचारिक बुवाबाजी यांचा आसरा न घेता सहजस्वभावी शब्दकळेतून मुक्तछंदाच्या प्रवाहाला आपलेसे करीत जाणारी या संग्रहातील कविता कवितेच्या विचक्षण वाचकाचे लक्ष वेधून घेणारी आहे.
- आशुतोष पाटील