डॉ. श्रुती वडगबाळकर यांनी हयातभर अध्यापनाचे कार्य करीत असतानाच आपल्यातील सर्जनशीलतेला आणि आस्वादकतेला कुठे बाधा येणारा नाही, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. त्यातूनच त्यांच्यातील ललितलेखिका आणि विवेचक समीक्षिका घडत गेली. ही घडणूक होताना त्यांनी अवतीभवतीचे भान राखण्याचा सातत्याने प्रयत्न केला. समाजमनापासून व्यक्तिमनापर्यंतचे सर्वस्तरीय भान त्यांनी आपल्या लेखनात सातत्याने प्रकट केले. समीक्षक हा सर्जनशील लेखक असेल तर त्याच्या लेखनाला वेगळी झळाळी कशी प्राप्त होते याचे उदाहरण म्हणजे डॉ. श्रुती वडगबाळकर यांचे लेखन समोर ठेवता येईल. या प्रक्रियेतूनच त्यांनी वारंवार काही समकालीन कलाकृतींवरील लेखन केलेले आहे. त्या लेखनाची एकत्रित भेट ‘मराठीतील निवडक साहित्य-समीक्षा’ या शीर्षकाखाली वाचकांना, जाणकारांना मिळते आहे, हे या दृष्टीने महत्त्वाचे वाटते.
प्रस्तुत ग्रंथात डॉ. श्रुती वडगबाळकर यांनी ज्या कलाकृती रसास्वादासाठी निवडलेल्या आहेत त्या बहुतेक या शतकातल्या पहिल्या पर्वातल्या आहेत. खाउजा संस्कृतीच्या परिणामकारकतेच्या उत्तर पर्वातील या कलाकृतींवर लिहितांना लेखिका समकालीन नैतिकता आणि कलाकृतीची सर्वांगीण मूल्यात्मकता तपासात मुक्तपणे त्यातील स्वत्त्वाला सामोरी जाते. आणि हे करताना या मूल्यमापनात कुठेही सैद्धांतिक बोजडपणा येऊ नये, हे लेखन सर्वसामान्याला अधिक भावेल, याची त्या पुरेपूर दक्षताही घेतात.
मराठी समीक्षेत आस्वादक समीक्षा अधिक महत्त्वाची मानली जाते ती वर्ण्य कलाकृतीचा अधिक खोलात जाऊन सर्वांगीण शोध घेते, म्हणून. आपल्या समीक्षालेखनासाठी डॉ. श्रुती वडगबाळकर यांनी हीच वाट निवडल्याने यात चर्चिल्या गेलेल्या कलाकृतींना योग्य न्याय मिळाला आहे. आणि म्हणूनच अभ्यासकांना हा समीक्षाग्रंथ महत्त्वाचा ठरावा, हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करावासा वाटतो.
- डॉ. रवींद्र शोभणे
अध्यक्ष, 97 वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन, अमळनेर