“मानवी भूगोल” या पाठ्यपुस्तकाच्या निर्मितीमागे एक ठोस उद्देश आहे. भूगोलाच्या या अत्यंत महत्त्वाच्या शाखेचे समग्र व सुलभ स्वरूपात ज्ञान विद्यार्थी व अभ्यासकांना उपलब्ध करून देणे. भूगोल ही एक केवळ भौगोलिक स्थळांची माहिती देणारी शाखा नसून मानव व निसर्ग यांतील परस्परसंबंधाची सखोल मांडणी करणारी ज्ञानशाखा आहे. सदर पुस्तकात मानवी भूगोलाच्या मूलभूत संकल्पना, दृष्टिकोन, मानवी वंश, संस्कृती, भाषा, धर्म, मानव-पर्यावरण सहसंबंध व इतर संबंधित विषयांचा सविस्तर आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. विषयाचा प्रदीर्घ अध्यापनानुभव, तज्ञ मंडळींशी चर्चा व मूळ संदर्भ ग्रंथांच्या आधारे हे पाठ्यपुस्तक लिहिले आहे. विषयाचे आकलन सुलभ व्हावे म्हणून विविध नकाशे, आकृत्या, सारणी, छायाचित्रे यांचा योग्य त्या ठिकाणी वापर केलेला आहे. भूगोल हे शास्त्र असल्याचे भान ठेवून जास्तीत जास्त शास्त्रीय भाषा संकल्पनांचा वापर करून अप्रचलित परिभाषिक शब्दांसाठी इंग्रजी शब्द दिले आहेत. या पुस्तकाची रचना करताना आम्ही विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा, संशोधक आणि शिक्षक या सर्वांचा विचार करून मुद्देसूद व सुलभ भाषा वापरून मांडणी केलेली आहे. प्रत्येक संकल्पना उदाहरणे, आकडेवारी, आकृती व तक्ते यांच्या सहाय्याने स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे विषय अधिक समजण्यास सुलभ होईल, अशी अपेक्षा आहे. मानवी भूगोलात नव्याने अंतर्भूत झालेल्या विविध भाषा, संकल्पना, प्रतिमाने, सिध्दांत यांचा समर्पक उदाहरण म्हणून वापर केला आहे.
यामुळे विद्यार्थी, संशोधक व शिक्षक यांना हा ग्रंथ नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे.