महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने अध्यात्मिक लोकशाही प्रस्थापित करण्याचे महत्त्वाचे कार्य वारकरी संप्रदायाने केलेले आहे. म्हणूनच आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगातही वारकरी संस्कृती आपले अस्तित्व टिकवून आहे. अठरा पगड जातीचे, विविध धर्मपंथाचे लोकं वारकरी संप्रदायाने जवळ केल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जनसामान्यांच्या पर्यंत वारकरी संप्रदायाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. वैभवशाली व सर्व समावेशक असणाऱ्या वारकरी संप्रदायाची, संतांच्या मूल्याधिष्ठित व मानवतावादी साहित्याची परंपरा खान्देशातही महत्त्वाची ठरलेली आहे. खान्देशच्या भूमीत निर्माण झालेले संत, कीर्तनकार, प्रवचनकार, महत्त्वाचे मठ, संस्थान यांचे कार्य मोलाचे आहे. खान्देशातील वारकरी सांप्रदायिक संतांनी निर्माण केलेली आध्यात्मिक लोकशाही, मानवता, सर्वधर्मसमभाव वृत्ती, सामाजिक समरसता, डोळस भक्ती याचा परामर्श घेता यावा. या हेतूने प्रेरित होऊन खान्देशातील वारकरी संप्रदाय या पुस्तकाचे लिखाण केलेले आहे. यात खान्देशातील वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे मठ, संस्थान यांचे कार्य व परंपरा. खान्देशातील वारकरी संतांचे समाज प्रबोधन व वाङ्मयीन कार्य, खान्देशातील महत्त्वाच्या कीर्तनकारांचे भक्ती प्रबोधन, समाज प्रबोधन व दिशादर्शक कार्य याविषयीचा परामर्श घेतलेला आहे.