मानवी प्रगतीचा पाया ज्ञानात आहे आणि त्या ज्ञानाचे सुयोग्य नियोजन म्हणजे अभ्यासक्रम होय. शिक्षण ही माहिती देण्यापुरती मर्यादित प्रक्रिया नसून ती व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाची, विचारक्षमतेची आणि मूल्यनिर्मितीची सृजनशील वाटचाल आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार ज्ञानाच्या आकलनावर, अनुप्रयोगावर आणि जीवनाशी असलेल्या संबंधांवर विशेष भर देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या पुस्तकात ज्ञानाची संकल्पना, त्याचे प्रकार, स्रोत, तसेच अभ्यासक्रमाचे स्वरूप, विकासाची तत्त्वे आणि विविध पद्धती यांचे सुसंगत विवेचन करण्यात आले आहे.
शिक्षक हा केवळ माहिती देणारा नसून विद्यार्थ्यांना ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणारा मार्गदर्शक असतो. त्यामुळे शिक्षक प्रशिक्षणाथ, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. विषय मांडताना सैद्धांतिकता आणि व्यवहार्यता यांचा समतोल राखण्यात आला आहे, तसेच सोपी भाषा, उदाहरणे आणि चिंतनात्मक प्रश्नांचा वापर करून वाचकांना विचारप्रवृत्त केले आहे.
विद्याथ-केंद्रित दृष्टिकोन स्वीकारून या पुस्तकात विविध शैक्षणिक उपक्रम, चर्चा विषय आणि प्रात्यक्षिक उदाहरणांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे वाचक केवळ माहिती ग्रहण करत नाही, तर तो विचार करतो, प्रश्न विचारतो आणि ज्ञानाशी संवाद साधतो.
आजच्या डिजिटल युगात माहिती सहज उपलब्ध असली तरी योग्य माहितीची निवड, विश्लेषण आणि उपयोग ही खरी कौशल्ये आहेत. अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना योग्य दिशा देतो, शिकण्याच्या प्रक्रियेला संरचना देतो आणि जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम बनवतो.