‘अखंडीत’ हा शशिकांत हिंगोणेकर यांचा नवा कविता-संग्रह एकाच वेळी त्यांचं आत्मभान, समाजभान आणि विश्वभान व्यक्त करु पाहतो. म्हणूनच कवीच्या मनात भळभळणारी जखम ही त्याची एकट्याची नाही. तसेच त्याचा लढासुद्धा अंतर्बाह्य आहे. तो अमानुष जग बदलण्याची वाट पाहतोय. शक्यता-अशक्यतांच्या अलीकडे व पलीकडेही जगणारा हा कवी एकांताच्या प्रदेशातून व दुभंगून जातानासुद्धा विध्वंसाच्या उंबरठ्यावरील जगासाठी लढू पाहतोय. त्याच्या अखंडीत लढ्यातील त्याचं शस्त्र म्हणजे त्याची कविता. काळाचं विशिष्टत्व आणि अनंतत्व या दोहोंचं भान त्याला आहे. म्हणूनच कवी कधीतरी संपेल, पण त्याच्या माघारीसुद्धा त्याची कविता न्याय्य हक्कांसाठी लढत राहील, असा दुर्दम्य आत्मविश्वास कवीला आहे. माणसांच्या स्वप्नांवर बुलडोझर फिरत असताना कवितेचं संविधानिक शस्त्र तो चालवत राहतो. त्यासाठी नेहमी त्याला दुःखाचा रुमाल पिळून सुकवायचा असतो. निदान काही काळ तरी स्थितप्रज्ञ जगायचं असतं. हरवून गेलेल्या कविमित्रांना जागवायचं असतं. एका अथ ही कविता म्हणजे अस्वस्थतेचा अखंड जागर आहे. पण छलचक्राचा भोवरा फोडून अगदी ही लढाई संपेपर्यंत आणि कवीचं जीवन ओलांडूनसुद्धा लढत राहण्याची भाषा त्याची कविता करते. किंबहुना केवळ कवीचेच नव्हे, तर सध्याच्या व्यामिश्र आणि आभासी विश्वाचेही संजीवन बनण्याच्या आशेची भाषा ती बोलत राहते.
शशिकांत हिंगोणेकर हे काय ताकदीचे कवी आहेत, याचा आणखी एक प्रत्यय म्हणजे त्यांचा ‘अखंडीत’ हा कविता-संग्रह!
- प्रा. राजा दीक्षित