शिक्षण ही केवळ माहिती देण्याची प्रक्रिया नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची सातत्यपूर्ण वाटचाल आहे. आधुनिक शिक्षणव्यवस्थेत मूल्यनिर्धारण हे केवळ परीक्षेपुरते मर्यादित न राहता शिकण्याच्या प्रक्रियेशी जोडले गेले पाहिजे, ही भूमिका या पुस्तकातून स्पष्टपणे अधोरेखित केली आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार मूल्यनिर्धारण हे सतत चालणारे, लवचिक आणि शिकण्याला सहाय्य करणारे असावे, यावर भर देण्यात आला आहे. त्याच मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेऊन या पुस्तकात बोधात्मक, भावात्मक आणि कार्यात्मक मूल्यनिर्धारणाच्या विविध पद्धती, तंत्रे व साधनांचा सविस्तर आढावा घेतला आहे.
शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रवासाचा मार्गदर्शक असतो. म्हणूनच शिक्षक प्रशिक्षणाथ, शिक्षक, संशोधक आणि शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. वाचकांना केवळ माहितीच नव्हे तर शिक्षणाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोण मिळेल.
मूल्यनिर्धारण ही भीती निर्माण करणारी प्रक्रिया नसून शिकण्याला प्रेरणा देणारी प्रक्रिया आहे, ही जाणीव या पुस्तकातून अधिक दृढ होईल. शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी योग्य मूल्यनिर्धारण प्रणाली आवश्यक आहे, आणि हे पुस्तक त्या दिशेने एक अर्थपूर्ण प्रयत्न आहे.