द्यायचंच असेल, तर आयुष्यात दुःख दे, संकटे दे वगैरे सारखी वाक्य कुंतीचा हवाला देऊन कुणी उमेद बांधण्यासाठी सांगतो. कुणी तुकोबाला मदतीला घेऊन सुख पाहता जवापाडेची आवर्तने करीत, आयुष्यात कणभर सुखासाठी मणभर दुःख झेलावं लागतं म्हणून सांगतो. कुणी संत, महंत, महाम्ये, महापुरुषांनाही दुःखातून मुक्ती नसल्याची आठवण करून देतो. रामाची वनवासातील वणवण असो की, कृष्णाचं अंतसमयीचं एकटं असणं. ही दुःखे नव्हती तर काय होते, म्हणून धीर बांधू पाहतो. कोणी कर्माला, कोणी धर्माला, कोणी नीतीला, कोणी नियमांना कासरे लावून समोर उभं करतो. एकुणात काय, तर वेदनेच्या वाटेने चालणारा तू जगात काही एकटा अन् एकमेव जीव नाही. अनेक जिवांनी दुःखाच्या दाहकतेत शरणागती न स्वीकारता जगण्याचे अर्थ शोधून आयुष्याला नवे आयाम दिल्याचं सांगतो.